प्रत्येक घासामागचं विज्ञान : पचन आणि पोषकतत्त्वांचे महत्त्व
आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आणि व्यवस्थित कार्य करण्यासाठी पोषकतत्त्वांची आवश्यकता असते. अन्न खाल्ल्यावर त्यातून मिळणारी पोषकतत्त्वेच शरीराला ऊर्जा देतात, हाडे, स्नायू आणि पेशी तयार करतात, आणि शरीरातील विविध कार्ये सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतात. अन्न हे शरीरासाठी इंधनासारखे असते. मात्र, हे अन्न शरीराला थेट उपयोगी पडत नाही. त्यासाठी त्याचे पचन होणे गरजेचे असते. पचन म्हणजे अन्नाचे छोटे घटकांमध्ये विघटन होणे, जेणेकरून ते शरीरात शोषले जाऊ शकतील. पचनप्रक्रिया तोंडापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत चालते. या प्रक्रियेत अनेक अवयव भाग घेतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे रस व एंझाइम्स अन्नावर प्रक्रिया करतात.
पचनाची सुरुवात तोंडातून होते. जेव्हा आपण अन्न चावतो, तेव्हा तोंडातील लाळग्रंथी लाळ तयार करतात. लाळेमध्ये अॅमिलेस नावाचा एक एंझाइम असतो, जो अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतो. नंतर अन्न अन्ननलिका (इसोफॅगस) मार्गे पोटात जाते. पोटात जठरग्रंथी अन्नावर प्रक्रिया करणारे तीन महत्त्वाचे रस तयार करतात – हायड्रोक्लोरिक अॅसिड (HCl), पेप्सिन, आणि म्युकस. HCl अन्न आम्लीय बनवते, पेप्सिन प्रथिनांचे पचन करते आणि म्युकस पोटाच्या आतील भिंतीचे संरक्षण करते. पुढे अन्न लहान आतड्यात जाते, जेथे मुख्य पचन आणि पोषण शोषण होते. येथे यकृतातून येणारा पित्तरस (bile), अग्न्याशयाचा पाचक रस, आणि आतड्यांतील आतड्यांचे रस हे एकत्र येतात. हे रस अन्नातल्या प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स यांचे सुटे घटकांमध्ये विघटन करतात. अन्नाचे हे सुटे घटक आतड्याच्या भिंतीतून शोषले जाऊन रक्तात मिसळतात आणि संपूर्ण शरीरात पोहोचतात. उरलेले अन्न पुढे मोठ्या आतड्यात जाते, जिथे पाण्याचे व लवणांचे शोषण होते. शेवटी जे अन्न पूर्णपणे न पचता उरते, ते मलाच्या स्वरूपात गुदद्वाराद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
शरीरासाठी आवश्यक पोषकतत्त्वे दोन मुख्य प्रकारात विभागली जातात – मॅक्रोन्युट्रिएंट्स (Macro Nutrients) आणि मायक्रोन्युट्रिएंट्स (Micro Nutrients).
मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणजे ज्या पोषकतत्त्वांची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी आणि पाणी यांचा समावेश होतो.
कार्बोहायड्रेट्स हे शरीराला ऊर्जा देणारे मुख्य स्त्रोत आहेत. ते ग्लुकोजमध्ये बदलून त्वरित ऊर्जा निर्माण करतात.प्रथिने शरीराच्या पेशी, स्नायू, त्वचा आणि केस तयार करण्यासाठी उपयोगी असतात. ते शरीराच्या दुरुस्तीचे काम करतात.चरबी ही ऊर्जा साठवण्यासाठी उपयोगी असते, तसेच ती काही जीवनसत्त्वे शरीरात शोषण्यासाठी गरजेची असते.
पाणी हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे द्रव आहे. शरीरात सुमारे ७०-७२% पाणी असते. पाणी अन्नपचन, पोषण शोषण, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, विषारी घटक बाहेर टाकणे अशा अनेक कामांसाठी उपयुक्त आहे. पाणी पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याची प्रक्रिया सुधारते,पेशींना ओलावा आणि योग्य संपर्क राखून ठेवते (Hydration आणि Communication वाढवते), शरीरातील ऊतकं (tissues) चिकटण्यापासून रोखते, पेशींमधील विद्युत गुणधर्म कायम राखते, श्वसन करताना ऑक्सिजन ओलसर ठेवते, ज्यामुळे श्वास घेणे सुलभ होते, अंतर्गत अवयव, सांधे व हाडांना धक्क्यांपासून संरक्षण देते, शरीरातील विषारी घटक (toxins) आणि अपशिष्ट (waste) बाहेर टाकण्यास मदत करते.
मायक्रोन्युट्रिएंट्स म्हणजे ज्या पोषकतत्त्वांची शरीराला कमी मात्रेत आवश्यकता असते, पण ती शरीरासाठी तितकीच आवश्यक असतात. यामध्ये विटामिन्स (जीवनसत्त्वे) आणि खनिजे (Minerals) यांचा समावेश होतो. विटामिन्स शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, वाढ आणि हाडांच्या मजबुतीस मदत करतात, तसेच रक्त तयार करतात. जीवनसत्त्व A, B, C, D, E आणि K या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. ही आपल्याला फळे, भाज्या, दूध, अंडी, धान्य आणि सुकामेवा यामधून मिळतात. खनिजे म्हणजे कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक इत्यादी घटक. ते हाडे मजबूत करतात, रक्तातील हिमोग्लोबिन तयार करतात, मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत करतात आणि शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया योग्यरित्या चालू ठेवतात. खनिजे आपल्याला दूध, हिरव्या भाज्या, अंडी, कडधान्ये, सुकामेवा आणि मांसाहारामधून मिळतात.
प्रत्येक व्यक्तीची पोषण गरज वेगळी असते. लहान मुले, किशोरवयीन मुलं, प्रौढ, गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती यांचे पोषण वेगवेगळे असते. त्यांचं वय, शारीरिक कामकाज, आरोग्य, वजन, उंची आणि जीवनशैली यावर पोषण अवलंबून असते. त्यामुळे ‘एकसारखा आहार सगळ्यांसाठी’ असा नियम लागू पडत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या गरजेनुसार आणि शरीराच्या प्रकृतीनुसार संतुलित आणि पोषक आहार घेतला पाहिजे. एकूणच, पचन प्रक्रिया, पोषकतत्त्वांचे ज्ञान आणि संतुलित आहाराची सवय हे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. योग्य पोषण घेतल्यास आपले शरीर केवळ रोगमुक्त राहत नाही, तर ते अधिक ऊर्जावान, सक्रिय आणि सुदृढ बनते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात सर्व प्रकारची पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात घेतली पाहिजेत.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891