तंदुरुस्तीचा मंत्र – FANS
आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आणि तंदुरुस्त राहणं हे अनेकांचं स्वप्न बनलं आहे. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ व्यायाम किंवा डाएट पुरेसं नाही – त्यामागे एक शास्त्रीय आणि समजूतदार दृष्टिकोन असतो. FANS फॉर्म्युला म्हणजे असाच एक मार्ग, जो तुम्हाला केवळ चांगलं दिसण्यातच नाही, तर दीर्घकाळ निरोगी राहण्यात मदत करतो. FANS म्हणजेच –
F = Fat (चरबी वाढ)
A = Acidic Body (अम्लीय शरीर)
N = Nutritional Deficiencies (पोषणातील कमतरता)
S = Stress and Lack of Sleep (तणाव आणि झोपेचा अभाव)
या चार गोष्टी तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. त्यांचा योग्य वेळी विचार न केल्यास, तुमच्या शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं.
F – चरबी – आरोग्याच्या मुळावर घाव करणारा अदृश्य शत्रू
आजच्या जीवनशैलीत “चरबी” म्हणजे केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून टाळण्याची गोष्ट राहिलेली नाही – ती आता आपल्या संपूर्ण आरोग्याच्या मुळाशी संबंधित समस्या बनली आहे. शरीरात चरबी आवश्यक असली, तरी तिचा साठा जर अवांछित ठिकाणी व प्रमाणाबाहेर झाला, तर ती अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देते.
- चरबी साचते कुठे आणि का?
जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही, तेव्हा अन्नातील चरबी आणि साखरेचे अंश पचनसंस्थेतून रक्तप्रवाहात जातात आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. हीच चरबी पुढे कोलेस्टेरॉल वाढवते आणि अगदी तरुण वयात हृदयविकाराचे धक्कादायक प्रसंग घडतात. ही फक्त हृदयाची समस्या नसते – वाढलेल्या चरबीमुळे गुडघेदुखी व पाठदुखी, पचनाचे विकार,श्वास घेण्यास अडचण,मधुमेह (डायबिटीस) ,स्नायूंमध्ये अशक्तपणा यासारखे शरीरात इतरही त्रास दिसून येतात. कंबरेचा आकार हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे. ३२” – ३४” च्या आत कंबरेचा घेर ठेवणं (सरासरी ५’४” ते ५’८” उंचीसाठी) आदर्श मानला जातो. त्यापेक्षा वाढलेली कंबर ही सूचित करते की आपल्या शरीरात चरबीचा साठा अपायकारक पातळीवर गेला आहे. - चरबीचे दुष्परिणाम –
चरबी ही फक्त वजन वाढवत नाही तर, जर ही चरबी शरीरातील विविध अवयवांवर साठू लागली, तर पुढील गंभीर समस्या निर्माण होतात: जसे की ,
यकृतावर साठल्यास – फॅटी लिव्हर
रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास – कोलेस्टेरॉल वाढ व हृदयविकार
स्नायूंमध्ये – उच्च रक्तदाब
अंडाशयात – PCOD/PCOS
पेशींमध्ये – डायबिटीस
हार्मोनल ग्रंथींवर – हार्मोनल असंतुलन
ही प्रक्रिया शरीरासाठी एक सततचा आतल्या आत सुरू असलेला लढा बनते – ज्यामुळे शरीर दाहावस्थेत जातं आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते - चरबी शरीरात येते कुठून?
या चरबीचा स्त्रोत मुख्यतः आपल्या अन्नपद्धतीत लपलेला आहे. रोजच्या आहारातील प्राणी-आधारित अन्न जसे की चिकन, मटण, अंडी, दूध, दही यामुळे शरीरात सॅच्युरेटेड फॅट्स जमा होतात. त्याचबरोबर प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ – पिझ्झा, बर्गर, शुद्ध पिठाचे पदार्थ, साखर, केचप, पॅकबंद फळांचे रस यामुळे चरबीचा साठा वाढतो. या अन्नपदार्थांचा सातत्याने व अतिरेकाने वापर केल्यास शरीरात ही चरबी वर्षानुवर्षे जमा होत जाते आणि जुनाट आजारांचं कारण बनते – ज्याला ‘लाइफस्टाइल डिसीज’ म्हणून ओळखलं जातं.
A – अम्लीय शरीर: असंतुलनाची सुरुवात आतूनच
आपण निसर्गाचा एक भाग आहोत. आपलं शरीर पाच मूलभूत घटकांनी बनलेलं आहे – पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. यामध्ये पाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्या शरीरात सुमारे ७२% पाणी असतं आणि ते पाणी जर नैसर्गिक संतुलनात असेल, तर शरीर निरोगी राहू शकतं. या संतुलनासाठी शरीराचा पीएच स्तर – म्हणजे अन्न पचवण्याचं, ऊर्जेचं आणि पेशींमध्ये होणाऱ्या क्रियांचं माप – सुमारे ७.२ च्या आसपास असणं गरजेचं असतं. जेव्हा हे पीएच संतुलन बिघडतं, तेव्हा शरीर हळूहळू अम्लीय (Acidic) होत जातं – आणि याच मूळातून अनेक आजार जन्म घेतात. आपण आज जे अन्न खातो ते नैसर्गिक, पाण्याने भरलेलं नसतं. पॅकेटमध्ये बंद अन्न, साखर, मैदा, तेलकट पदार्थ, मांसाहार, बिस्किटं, केचप, कोल्ड ड्रिंक्स अशा अनेक गोष्टींमध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. जेव्हा आपण अशा प्रकारचं अन्न घेतो, तेव्हा शरीराला ते पचवण्यासाठी अतिरिक्त पाण्याची गरज भासते – आणि हे पाणी ते शरीराच्या विविध भागांतून खेचून घेतं. ज्या भागांतून पाणी घेतलं जातं, तिथे अॅसिड तयार होतो, आणि अशा प्रकारे शरीराचं आतलं वातावरण अम्लीय होऊ लागतं. अम्लता वाढली की शरीराचं चयापचय (metabolism) मंदावतो, पचन कमजोर होतं, सूज येते, थकवा जाणवतो, आणि संसर्ग जलद पसरतो.
इतकंच नाही, तर अम्लीय वातावरणात कर्करोगासारख्या पेशीही वाढू लागतात. त्यामुळे आपल्या अन्नाच्या निवडीचं परिणामकारकतेने निरीक्षण करणं आवश्यक आहे. आयुर्वेद सांगतो की शरीर क्षारीय ठेवण्यासाठी आपल्या आहारात ७०% सात्विक अन्न असायला हवं – जसं की फळं, हिरव्या पालेभाज्या, नारळपाणी, फळांचा रस – म्हणजे पाणी असलेलं, ताजं अन्न. उरलेलं २०% अन्न राजसिक असावं – म्हणजे शिजवलेलं, पण घरगुती व नैसर्गिक अन्न जसं की गूळ, शेंगदाण्याचं तेल, खोबरेल तेल. आणि फक्त १०% अन्न तामसिक असावं – जसं की जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ, शुद्ध पीठ, तेलकट अन्न, साखर, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स इ. मात्र अम्लता केवळ अन्नामुळे होत नाही. आपल्या विचारांचा, भावना आणि मानसिकतेचा सुद्धा शरीरावर परिणाम होतो. जेव्हा आपण रागावतो, ताण घेतो, चिंता करतो, सतत नकारात्मक विचार करतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचं तणावाचं हार्मोन वाढतं. त्यामुळे शरीर अधिक अम्लीय होतं. आणि म्हणूनच, केवळ खाणं नाही, तर सकारात्मक विचार, संयम आणि शांती हे देखील शरीर क्षारीय ठेवण्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. मांसाहार हा अम्लता वाढवणारा आणखी एक मोठा कारणीभूत घटक आहे. माणसाचं शरीर मांस पचवण्यासाठी बनलेलं नाही. मांस पचवायला कधीकधी ३०–४० तास लागतात. तोपर्यंत त्याचा अर्धवट विघटन होतो आणि शरीरात अम्लता वाढते. याखेरीज एक आध्यात्मिक पैलूही आहे. जेव्हा एखादा प्राणी मारला जातो, तेव्हा त्याच्या मनात भीती, तणाव, वेदना, राग यांसारख्या नकारात्मक भावना निर्माण होतात. या भावना त्या मांसात साठून राहतात. जेव्हा आपण त्या प्राण्याचं मांस खातो, तेव्हा त्या भावना आपल्या शरीरात येतात आणि हळूहळू आपल्या मन, विचार आणि आरोग्यावर परिणाम करतात.
सकाळच्या वेळेला शरीराचं पीएच अत्यंत नाजूक असतं. रात्री झोपल्यापासून ६–८ तास उपवासाची अवस्था असते. त्या काळात शरीर नैसर्गिकरित्या थोडं अम्लीय होतं. पण आपण सकाळी उठताच जर चहा किंवा कॉफी घेतली, तर त्या अॅसिडिक पेयामुळे अम्लता अधिक वाढते. यासाठीच उपवास सोडताना किंवा दिवसाची सुरुवात करताना शरीरात पाणी आणि क्षारीय अन्न जायला हवं – जसं की लिंबूपाणी, आवळा रस, लिंबू + दालचिनीचं कोमट पाणी. हे शरीराचं पीएच संतुलित करतं आणि शरीर हायड्रेट राहतं. लोकांना वाटतं की अम्लता म्हणजे फक्त अपचन, पण वास्तवात अम्लता म्हणजे शरीराच्या रचनेत झालेलं सूक्ष्म पण गंभीर असंतुलन असतं. ते अनेकदा आपण न समजून घेता दुर्लक्ष करतो. शरीर जेव्हा पचवू शकत नाही, निघवू शकत नाही किंवा वापरू शकत नाही असं काही जेव्हा वारंवार घेतं, तेव्हा ही अम्लता अधिक खोलवर साचते. या सगळ्याचा अर्थ इतकाच – की आपल्या शरीराला आणि मनाला संतुलनात ठेवण्यासाठी, आपण फक्त अन्न नाही, तर विचार, भावना, सवयी, आणि जीवनशैली यावरही लक्ष द्यायला हवं. शरीरामध्ये जेवढं नैसर्गिक अन्न, स्वच्छ पाणी, शांत मन आणि सकारात्मकता असेल, तेवढंच शरीर क्षारीय राहील – आणि एकदा शरीर क्षारीय झालं, की रोग दूर राहतात, ऊर्जेत वाढ होते.
N – पोषणाची कमतरता:
दिसत नाही, पण आतून कमजोर करते.आपल्याला काही त्रास झाला, किंवा शरीर थकलं, की आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण देवाला दोष देतो, किंवा नशिबाला जबाबदार धरतो. पण कधी आपण स्वतःला विचारतो का – “माझं शरीर अशा अवस्थेत कसं पोचलं?” अनेक वेळा आपलीच निष्काळजीपणा किंवा चुकीची जीवनशैली यामागे कारणीभूत असते. आजारी पडणं हा स्वतःत एक ‘आजार’ नसतो, तर तो एका चुकीच्या साखळीचा परिणाम असतो – अन्न निवड, झोप, मानसिक तणाव, आणि सर्वात महत्त्वाचं – पोषणाची कमतरता. अनेक वेळा लोक म्हणतात की, “आपण जग बदलू”, “समाज सुधारू”, पण त्या आधी आपल्या स्वतःच्या शरीराची शारीरिक स्थिती तपासली पाहिजे.
कारण जर शरीर साथ देत नसेल, तर कोणतीही मोठी स्वप्नं अपूर्णच राहतात. भारतात जवळपास ८२% ते ८५% लोकांमध्ये पोषणतत्त्वांची कमतरता आहे. विशेषतः व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, झिंक, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा अभाव मोठ्या प्रमाणात आढळतो. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगायचं झालं, तर उपचारासाठी आलेल्या ९५% रुग्णांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता स्पष्ट दिसून आली आहे. हे चित्र फारच चिंताजनक आहे. ही कमतरता का होते? कारण आज बहुतेक लोक ज्या प्रकारचं अन्न घेतात, ते अम्लीय (acidic) असतं – म्हणजे शरीरात तणाव, सूज आणि अपचन निर्माण करणारं. आणि जेव्हा शरीरच अशा प्रकारचं असतं, तेव्हा ते नीट पोषण शोषू शकत नाही. अम्लीय शरीरात आपल्याला वाटतं की आपण फळं, भाज्या खात आहोत; सप्लिमेंट्स घेत आहोत; डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेत आहोत – पण प्रत्यक्षात त्या सर्व गोष्टी शरीर नीट पचवू शकत नाही, आणि त्या पोषणतत्त्वांचा उपयोग न होता, ती थेट शरीरातून बाहेर फेकली जातात. या सगळ्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. आपण जे अन्न खातो, ते बहुतेक वेळा शिजवलेलं, गरम केलेलं असतं. त्यामुळे त्यातील नैसर्गिक एन्झाईम्स (pachak enzymes) नष्ट होतात. हे एन्झाईम्स म्हणजे अन्न पचवण्यासाठी लागणारी नैसर्गिक साधनं. हीच साधनं जर नसतील, तर आपण कितीही चांगलं अन्न खाल्लं तरी ते नीट पचत नाही. आणि पचन नीट नाही, तर पोषण शोषणही होत नाही.
आयुर्वेद सांगतो की सुमारे ३०% ते ४०% अन्न कच्च्या स्वरूपात – म्हणजे फळं, काकडी, गाजर, कोशिंबीर – असणं गरजेचं आहे. पण आज बहुतेक वेळा आपल्या जेवणात अशा प्रकारचं कच्चं अन्न फार कमी असतं. पण फक्त अन्नाची निवड पुरेशी नाही. ज्या मातीवर ही पिकं उगम पावत आहेत, तीच माती रासायनिक खतांमुळे आज अशक्त बनली आहे. मातीमध्ये जर नैसर्गिक खनिजं, पोषक घटक नसेल, तर त्या जमिनीवर उगवलेल्या भाज्यांमध्येही ते पोषण मिळणार नाही. म्हणजे आपण जे खातो ते दिसायला ताजं असलं, तरी त्यात शरीराला गरज असलेले घटक फारच कमी असतात. कधी कधी असंही होतं की आपण डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेतो, पोषणतज्ञांनी दिलेले सप्लिमेंट्स घेतो, तरीही शरीरात सुधारणा दिसत नाही. कारण अशा परिस्थितीत शरीर स्वतःच ते पोषण स्वीकारायला तयार नसतं. अशा वेळी अन्नावर खर्च होतो, औषधं घेतली जातात – पण पोषण मिळत नाही. शरीर पोषण शोषून न घेता त्याचा ७५% भाग बाहेर टाकतं. सप्लिमेंट्स हा उपाय असतो – पण तत्पुरता. त्याचा वापर फक्त विशिष्ट काळापुरता असावा. जेव्हा शरीराची कमतरता भरून निघते, तेव्हा ते सप्लिमेंट्स घेणं थांबवणं गरजेचं असतं. अन्यथा त्याचा शरीरावर उलटा परिणाम होऊ शकतो. याचं एक उदाहरण म्हणजे फॅक्चर झालेलं हाड. फॅक्चर झालं की डॉक्टर प्लास्टर लावतात – पण ते शेवटी काढलं जातं ना? जर ते प्लास्टर कायम ठेवलं, तर तेच हाड खराब होईल, त्वचा सडू लागेल, आणि एकदाचा उपयोगी उपाय नंतर हानीकारक ठरेल. त्याचप्रमाणे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारकच असतो. शरीराला जे लागतं ते वेळेवर आणि योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. शरीराने ते शोषण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आणि यासाठी आपलं शरीर अम्लीय न ठेवता क्षारीय ठेवणं, नैसर्गिक अन्न खाणं, शुद्ध विचार करणं आणि मातीपासून प्लेटपर्यंत पोषणाची साखळी जपणं – हेच आपल्या आरोग्याचं खरं रहस्य आहे.
S – तणाव आणि झोपेचा अभाव:
मन थकले, शरीर थकलं आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याला आवडत नाहीत, पण तरीही त्यांचा सामना करावा लागतो. कधी नात्यांमध्ये दुरावा, कधी कामाचा अति ताण, तर कधी आयुष्यात घडलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, असं वाटणं — हे सगळं तणावाचं मूळ असतं. आणि जेव्हा या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही, तेव्हा हा तणाव हळूहळू मनात खोलवर रुजतो. आपण त्यापासून दूर जाऊ शकत नाही, पण त्याला सामोरं जाणंही सोपं राहत नाही — हीच स्थिती शरीरासाठी घातक ठरते. तणाव ही काही नवीन गोष्ट नाही.
प्राचीन काळातही माणूस तणाव अनुभवत असे. गुहेत राहणाऱ्या माणसाला, समोर अचानक सिंह आला, तर दोनच पर्याय असायचे — लढणं किंवा पळणं. त्या क्षणी शरीरात तात्काळ ‘फाइट किंवा फ्लाइट’ प्रतिक्रिया निर्माण होई. पण सिंह निघून गेला की तणावही संपायचा. तो तणाव अल्पकाळचा असायचा आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकत नसे. आज मात्र आपण अशा सिंहापासून पळत नाही, पण तणावात मात्र कायम जगतो. रोजची कामं, अपेक्षा, आर्थिक अडचणी, नातेसंबंधांमधील गुंतागुंत — या सर्व गोष्टी सतत मनावर ताण ठेवतात. ही अवस्था दीर्घकाळ टिकते आणि शरीर त्यातून बाहेर येण्याची संधीच मिळत नाही.
त्यामुळे आजचा तणाव फक्त मानसिक नसतो, तर तो आपल्या शरीरावरही खोल परिणाम करतो. या सततच्या तणावामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा ताण-निर्मिती करणारा हार्मोन सतत वाढत राहतो. यामुळे शरीराचा नैसर्गिक ताळमेळ बिघडतो — पचन प्रणाली कोलमडते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, हृदयावर ताण वाढतो, आणि झोपेची गुणवत्ता खालावते. झोपेचा अभाव आणि तणाव यांचं नातं एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. तणावामुळे झोप येत नाही आणि झोप न मिळाल्यामुळे तणाव वाढतो — अशी ही दुष्ट चक्र बनते.
मानवी शरीरात दोन प्रकारचे ताण असतातः
१. सकारात्मक ताण
२. नकारात्मक ताण
सकारात्मक तणाव – अंतर्गत ताकदीचा अदृश्य आधार
तणाव म्हटलं की आपल्या मनात लगेच त्रास, चिंता आणि थकवा या भावना येतात. पण प्रत्येक तणाव घातकच असतो असं नाही. काही तणाव असेही असतात जे आपल्याला बळकट करतात, मार्ग दाखवतात आणि अंतर्गत शक्ती निर्माण करतात. यालाच सकारात्मक तणाव (Positive Stress) म्हणतात — आणि तो आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. सकारात्मक तणाव असलेले लोक कोणत्याही अडचणीला घाबरत नाहीत. त्यांच्या आयुष्यात ताण-तणाव असतोच, पण त्यांचं लक्ष ‘समस्यांवर’ नव्हे, तर ‘उपायांवर’ असतं. ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यांचं जगणं केवळ यशासाठी नाही, तर वैयक्तिक वाढ आणि अंतरिक समाधानासाठी असतं. अशा व्यक्तींमध्ये एक गोष्ट सामान्य असते – ते त्यांच्या कमतरतांवर तक्रार करत नाहीत. उलट, त्या कमतरतांवर काम करून ते स्वतःला अधिक सक्षम बनवतात.
या सकारात्मक तणावाचा त्यांच्या आरोग्यावर कधीही नकारात्मक परिणाम होत नाही, कारण ते आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य समजून घेतात आणि त्याची योग्य काळजी घेतात. ते काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखतात. झोप, व्यायाम, आहार आणि शांत वेळ यांचा समावेश त्यांच्या दिनचर्येत असतो. त्यामुळे तणाव त्यांचं जीवन थकवणारा नसतो, तर ऊर्जा देणारा ठरतो. अशा लोकांमध्ये एक खास आत्मविश्वास असतो — त्यांच्या शरीरालाही हे ठाऊक असतं की हा तणाव ‘काळजी घ्यायची गोष्ट आहे’, पण ‘कधीही कायमचं राहणारी समस्या नाही’. शरीराला जेव्हा हे समजतं की तुम्ही परिस्थिती हाताळू शकता, तेव्हा ते सहकार्य करतं. त्यामुळे या तणावाचा अनुभव अधिक शिस्तबद्ध, प्रेरणादायक आणि आरोग्यपूर्ण होतो.
नकारात्मक तणाव – शांततेवर गडद सावली तणाव ही अशी भावना आहे जी हळूहळू, नकळत आपल्या जीवनात शिरते. आणि आपल्याला कळायच्या आतच ती मनात खोलवर रुतलेली असते. नकारात्मक तणावाच्या विळख्यात अडकलेले लोक सहसा सतत समस्यांमध्ये गुरफटलेले असतात. त्यांच्या मनात कायम एक अस्वस्थता असते — ना भूतकाळ सोडवलेला असतो, ना भविष्यावर विश्वास राहिलेला असतो. त्यामुळे ते वर्तमानातही अडकून पडतात. हे लोक बहुतांश वेळा त्यांचं आरोग्य दुर्लक्षित करतात. झोप अपुरी असते, आहार विस्कळीत असतो, आणि काम आणि जीवन यामध्ये काहीच समतोल नसतो. त्यांनी आपल्या जीवनशैलीकडे कधीच गांभीर्याने पाहिलेलं नसतं. त्यांचं मन सतत नकारात्मक विचारांनी व्यापलेलं असतं — अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता, किंवा स्वतःच्या क्षमतांवर शंका. अशा मनस्थितीत, जेव्हा आयुष्यात एखादा ताणाचा प्रसंग येतो, तेव्हा त्याचा शरीरावर थेट परिणाम होतो. तणावाच्या काळात शरीर आपली संपूर्ण ऊर्जा वापरून परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करतं.
पण जर मन आधीच थकलं असेल, तर ती ऊर्जा सुद्धा पुरेशी ठरत नाही. नकारात्मक तणावाचा एक मोठा धोका म्हणजे — तो तुमची मानसिक शांती हळूहळू नष्ट करतो आणि त्याचसोबत शरीराची रोगप्रतिकारशक्तीही कमी करतो. तुम्ही तुमची शक्ती व्यवस्थापित करू शकत नाही कारण तुमचं मन आधीच अस्थिर, गोंधळलेलं आणि थकलं असतं. अशा प्रकारचा तणाव नुसता आजार निर्माण करत नाही, तर तो एक “जैविक गोंधळ” (biological chaos) तयार करतो, ज्यात पचन बिघडतं, झोपेत व्यत्यय येतो, रक्तदाब वाढतो, आणि दीर्घकालीन आजारांना निमंत्रण दिलं जातं. नकारात्मक तणाव म्हणजे एक अशा सावलीसारखा आहे जी हळूहळू तुमच्यावर कब्जा करते. जर तुम्ही वेळेत त्याला ओळखून सामोरं गेलं नाही, तर तो तुमचं तेजच हरवून टाकतो. म्हणून, अशा तणावावर मात करण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल असतं. स्वतःला ओळखणं, आणि मग स्वतःवर काम करणं.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण झोपेचा विचार फक्त थकवा दूर करण्यासाठी करतो. परंतु खरे पाहता, झोप हा आपल्या शरीरासाठी एक औषध आहे – नैसर्गिक उपचाराची शक्ती. विशेषतः, योग्य वेळेवर घेतलेली झोप तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते. आयुर्वेदानुसार रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत घेतलेली झोप सात्विक झोप मानली जाते. ही झोप मन शांत करते, शरीर दुरुस्त करते आणि मेंदूला विश्रांती देते. पण जर तुम्ही रात्री १२ नंतर झोपत असाल, तर ती झोप राजसिक झोप ठरते — ज्यामध्ये शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. पहाटे २ नंतरची झोप ही तामसिक झोप असते, जी शरीराच्या नैसर्गिक चक्राविरुद्ध जाते आणि अनेक मानसिक व शारीरिक त्रासांना कारणीभूत ठरते. तुम्ही किती वेळ झोपता यापेक्षा, कधी झोपता हे अधिक महत्त्वाचे आहे. जर कोणी रात्री १२ ला झोपून सकाळी १० वाजता उठतो, तरीही त्याला प्रत्यक्षात फक्त २ ते ३ तासांची उपयुक्त झोप मिळते.
कारण शरीराचं जैविक घड्याळ, सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार कार्य करतं. यामुळे झोपेचा दर्जा कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर होतो. त्याचप्रमाणे, उशिरा अन्न सेवन करणं हा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही रात्री ८–९ च्या आधी जेवण घेतलं, तर ते सहज पचतं. परंतु रात्री १० नंतर किंवा मध्यरात्री अन्न घेतल्यास, ते पचायला १२–१४ तास लागू शकतात. शरीर त्या वेळेस झोपेच्या आणि पेशी दुरुस्तीच्या अवस्थेत असतं, पचनाच्या नव्हे. त्यामुळे पचन अपूर्ण राहतं, अन्न आम्लामध्ये रूपांतरित होतं आणि त्यातूनच ऍसिडिटी, फॅटी लिव्हर, सूज आणि इतर समस्या निर्माण होतात. विशेषतः यकृतावर (liver) याचा सर्वाधिक ताण येतो. शिवाय, सकाळी उठून रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेणं म्हणजे या असंतुलनात अजून इंधन ओतल्यासारखं आहे. शरीर रात्रभर जे अपचन झालेलं अन्न विसरून चहा पचवण्याच्या कामाला लागतो. हे अन्न मग शरीरात आम्ल स्वरूपात साठतं आणि कंबरेभोवती चरबीच्या स्वरूपात जमा होतं. आयुर्वेदात सांगितलं आहे की, “जो एकदा खातो तो योगी, दोन वेळा खातो तो भोगी, आणि तीन वेळा खातो तो रोगी.”
पूर्वी कमी खाणाऱ्याला रोगाची शक्यता कमी होती. परंतु आजच्या काळात लोक केवळ वारंवार खात नाहीत, तर उशिरा खातात आणि झोपही उशिरा घेतात. यामुळे त्यांच्या शरीरात विषारी घटक साठतात आणि नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया मंदावते. तणावमुक्त, निरोगी आणि सात्विक जीवनासाठी शरीराला निसर्गाच्या लयीत आणणं गरजेचं आहे. वेळेवर झोपणं, योग्य वेळी अन्न घेणं, आणि सकाळी अल्कधर्मी पेय (जसं की लिंबूपाणी, आवळा रस) घेणं – हे तुमचं शरीर आणि मन दोघंही क्षारीय ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
शरीराचं आणि मनाचं नैसर्गिक संतुलनच आपल्या दीर्घायुषी आणि रोगमुक्त आयुष्याचं गुपित आहे. आजचा प्रत्येक छोटा बदल उद्याचं मोठं आरोग्य घडवतो. FANS फॉर्म्युला ही चिपळेवरची आरती नसून, आपल्या शरीरासाठी असलेली नित्य पूजा आहे – ती श्रद्धेने आणि शिस्तीने केली, तर शरीरही मंदिरासारखं पवित्र आणि सशक्त बनतं.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891